पावसाळी वातावरणामध्ये डाळिंबावर डाग येऊ नये म्हणून करायच्या उपाययोजना आणि तेल्याग्रस्त बागेंमध्ये तात्काळ करायच्या फवारणी

खालील लेखांमध्ये अवकाळी पाऊस / ढगाळ वातावरणामध्ये आपल्या डाळिंब फळांवर डाग येऊ नये म्हणून कोणत्या उपाययोजना करायला हव्यात तसेच तेल्याग्रस्त बागेत कोणते स्प्रे घ्यावेत याविषयी मार्गदर्शन केलेले आहे.

डाळिंबशेती ब्लॉग्स

श्री सुशांत हिरालाल सुर्वे

4/22/20231 min read

पावसाळी वातावरणात फळांवर डाग येऊ नये म्हणून तसेच तेल्याग्रस्त बागेसाठी घ्यावयाची काळजी - श्री सुशांत हिरालाल सुर्वे.

पावसाळी वातावरणात साधरणतः बागेची काय काळजी घ्यावी याची आज सविस्तर माहिती घेऊ...!

पावसाळी वातावरणात स्प्रे घेताना पाऊस पडल्यावर लगेचच दुसऱ्या दिवशी फवारणी घ्यावी कि नाही असा बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रश्न असतो..तर पावसाळी वातावरणात तुमचे नेहमीचे आठवड्याला स्प्रे घेता त्याच पद्धतीत स्प्रे घेणे गरजेचे असते..पाऊस झाला म्हणजे लगेचच स्प्रे असं नाही..तर पाऊस पडून कडक ऊन जर पडले तर लगेचच फवारणी घ्यावी..!!सारखा संततधार पाऊस चालला तर स्प्रे ऐवजी कॉपर डस्टिंग/सल्फर डस्टिंग धुरळणी केली तरी चालेल

पावसाळी वातावरणाच्या दृष्टीने शेतकऱ्यांनी खालील गोष्टींची विशेष काळजी घ्यावी.

1) पुरेसा प्रकाश

पावसाळ्यात बऱ्याच वेळा सूर्यप्रकाशाचा अभाव असतो, ढगाळ वातावरण..सूर्यप्रकाशाचा अभाव इत्यादीने बागेतील आद्रता वाढत जाते. शिवाय झाडांचा अन्न तयार करण्याचे काम काही अंशी कमी होते. बुरशीजन्य रोगांच्या वाढीसाठी हे वातावरण पोषक असते.

त्यामुळे, पावसाळी दिवसांत आपल्या बागेला पुरेसा सूर्यप्रकाश भेटेल असे बघावे.

त्यासाठी- झाडांवर काही नेट वैगरे टाकल्या असतील तर त्या काढून टाका. बागेची काही प्रमाणात फळछाटणी घ्या. बाग जस गच्च राहणार नाही याची काळजी घ्या.

2)खेळती हवा

पावसाळयात आपल्या बागेत हवा खेळती राहील याकडे लक्ष द्यावे. हवा बागेत खेळती राहिल्यास बागेतील आद्र्रता कमी होण्यास मदत होते त्यामुळे अनेक बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव रोखला जातो.

त्यामुळे बागेत हवा खेळती राहील याकडे लक्ष द्यावे.

त्यासाठी- पावसाळी ऋतू आधी फळछाटणी, बागेच्या आजूबाजूला उसासारखे पीक नसावे. बागेच्या निदान दोन्ही बाजूने तरी हवा येण्यास जागा असावी.

3) छाटणी

उन्हाळ्यात सनबर्न चा प्रादुर्भाव जास्त होऊ नये म्हणून बरेच शेतकरी बागेला फुटवा ठेवतात, पूढे पावसाळा सुरु झाला कि मग फळछाटणी वेळेवर घेतली जात नाही. त्यामुळे फुटव्याने झाड गच्च असेल तर बागेत हवा खेळती राहत नाही, झाडाला व्यवस्थित सूर्यप्रकाश भेटत नाही. झाडावर पावसाचे पाणी साचून राहते, परिणामी अनेक प्रकारच्या डागांचा फळावर प्रादुर्भाव होतो.

त्यासाठी, पावसाळा ऋतू चालू होण्याआधी किंवा पावसाळ्याच्या आधी बागेची फळछाटणी करून घ्यावी.

4) पावसाळी वातावरणात फवारणीची वेळ

पावसाळी वातावरणात फवारणी हि नेहमी सकाळच्या वेळेतच काढावी. संध्याकाळच्या वेळी फवारणी टाळावी. तसेच कोणती ड्रेंचिंग जरी केली तरी ती सकाळच्या वेळेतच द्यावी. कोणतीही फवारणी हि रात्रभर झाडावर राहू देऊ नका. पावसाळ्यात रात्रभर झाड किंवा जमीन सुद्धा ओली ठेवत जाऊ नका.

त्यामुळे, पावसाळी वातावरणात फवारणी हि सकाळच्या वेळेतच घ्या.

5)ड्रीपने खते व पाणी

पावसाळ्यात ड्रीपने पाणी व खते पूर्णतः बंद न करीत त्याची मात्रा अर्धी करावी. उन्हाळ्यात ड्रीपने जर दोन तास पाणी चालू असेल तर ते एक तासावर आणावे. जमिनीच्या वाफसा कंडिशन नुसार पाणी सोडावे. तसेच खतांची मात्रा देखील निम्मी द्यावी.

त्यासाठी - वाफसा स्थिती सांगितल्याप्रमाणे पाणी सोडावे.

6)जमीन मशागत

अतिरिक्त पाऊस झाल्यास बागेत अजिबात पाणी साचू राहू देऊ नका.बागेत अतिरिक्त ओलावा झाल्यास जमिनीवरील तसेच जमिनीखालील बुरशींचा प्रादुर्भाव वाढतो.त्यामुळे बेड जास्त ओले असतील तर त्याची काही प्रमाणात खुरपणी सारखी जमीन हलवून द्यावी त्याने बेड मध्ये हवा जाण्यास जागा होऊन वाफसा स्थिती राहील. परिणामी पांढरी मुळी चांगली चालू राहील व झाडांचे अपटेकिंग पण वाढेल.

त्यासाठी बागेतील पाणी काढून द्यावे. बागेच्या चहुबाजूने मोठा चर घेतला तरी चालेल म्हणजे आजूबाजूच्या भागातील पाणी आपल्या बागेत येणार नाही.

7)अन्नद्रव्यांची कमतरता

पावसाळी वातावरणात जमीन बऱ्यापैकी ओली असल्याने पिकाला अन्नद्रव्यांची उपलब्धता चांगल्या प्रमाणात होत नाही.

परिणामी झाडे पिवळी पडणे, फळांची साईझ न होणे, पानांची कड जळणे इत्यादी प्रॉब्लेम जाणवतात.

त्यासाठी- पावसाळ्यात सूक्ष्म अन्नद्रव्यांची फवारणी घ्यावी. तसेच ड्रीपने आपल्यामार्फत दिले जाणारे अनारकिंग नवसंजीवनी हि स्लरी दिल्यास अपटेकिंग खूप चांगल्या प्रमाणात वाढून फळांची साईझ व झाडांना ग्रीनरी साठी चांगला रिझल्ट मिळतो.

8)बागेतील निरीक्षण

पावसाळ्यात आपण आपली बागेतील निरीक्षण हे सूक्ष्म असावे व त्यादृष्टीने प्रिव्हेंटिव्ह स्प्रे असावे. म्हणजे एखादा स्पॉट चा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढल्यावर त्यावर फवारणी घेण्यापेक्षा तो स्पॉट सुईच्या टोकाच्या आकारात असताना स्प्रे घेतलेला योग्य राहतो.

पावसाळ्यात फवारणी एखादा डाग येऊ नये म्हणून घ्यावी, डाग आल्यानंतर फवारणी घेतली तर ते डाग काही जाणार नाहीत किंवा. अशा फवारणीचा. तितपत रिझल्ट भेटणार नाही.

फवारणी करताना कॉपर/सल्फर चे मोलेक्युल अन्य बुरशीनाशके फवारताना पाण्याचा पीएच प्रथम ७ करून घ्यावा नंतर औषधें मिक्स करावीत, त्याने औषधांचा रिझल्ट १००% मिळतो. तसेच रिझल्ट जास्त दिवस टिकतो.

पीएच मीटर खरेदीसाठी येथे क्लिक करा.

9)इतर महत्वाच्या बाबी

  • - पावसाळ्यात बागेत पाणी साचून राहू देऊ नका.

  • - कोणतीही छाटणी घेतल्यानंतर कॉपर ची फवारणी घ्यावी.

  • - पावसाळ्यात ड्रीपने पाणी देऊन व स्प्रेडर वापरून मगच फवारणी घ्यावी, नाहीतर बऱ्याच वेळा जिथे फवारणीचे पाणी साचून राहिले आहे तिथेच फळावर स्पॉट येतात.

  • - बेसल डोस बागेला वेळेवर भरा म्हणजे झाडामध्ये रोगप्रतिकारक क्षमता वाढेल व बुरशीजन्य रोगांना कमी बळी पडेल.

  • - ड्रीपचे खतांचे वेळापत्रक चांगले चालू राहू द्यावे व पावसाळ्यात नत्रयुक्त खतांचा वापर टाळावा.

    पावसाळी वातावरणाच्या दृष्टीने बागेसाठी आवश्यक जवळपास सर्व मुद्दे वर कव्हर केलेले आहे. तरी वरील माहितीत काही शंका असल्यास विचारावे.

तेल्याग्रस्त बागेत तात्काळ करावयाच्या उपाययोजना- श्री सुशांत हिरालाल सुर्वे

तेल्या ग्रस्त बागेत डाळिंब तडकते असली तर

पहिली फवारणी:

कॉपर १.५ ग्राम + ब्रोमोपॉल अर्धा ग्राम प्रति लिटर घ्या.

दुसरी फवारणी:

कॅप्टाफ १.५ ग्राम + कॉन्टाफ १ मिली प्रति लिटर घ्या.

तसेच,

तिसरी फवारणी

सुडोमोनास + बॅसिलस ची फवारणी देखील फायदेशीर राहील. हि फवारणी बनविण्याची पद्धत व तेल्या ग्रस्त बागेतील उपाययोजना यांची सविस्तर माहिती तेल्या रोगावरील माझ्या लेखात दिलेली आहे. आपण त्यानुसार उपाययोजना कराव्यात.

चौथी फवारणी :

सेलिसिलिक ऍसिड ची घ्यावी.

ब्रोमोपॉल / कासुगामायसिन / व्हॅलिडामायसिन इत्यादी अँटिबायोटिक औषधांचा बुरुशीनाशकांमध्ये तज्ञ सल्ल्यानुसार वापर केल्यास फायदेशीर राहील.

सर्वांत महत्वाचे म्हणजे ज्या थोड्या झाडांवर तेल्याचे सुरुवातीला दिसत असेल त्याच्यावर पाठीवरील पंप ने दर ८ दिवसांमिळते मोरचूद चुना चा १ टक्के बोर्डो तयार करून फवारणी घ्यावी. याला आपण स्पॉट अप्लिकेशन म्हणूया, म्हणजे त्याच जागेवर तेल्या कंट्रोल केला तर तो बागेत इतरत्र जास्त पसरणार नाही.

बोर्डो तयार करताना त्याचा पीएच ७ होईल असे बघावे त्यासाठी पीएच मीटरचा वापर करावा.

वरील फवारणी करताना बागेला चांगल्या प्रमाणात ड्रीपने पाणी द्यावे व संध्याकाळच्या वेळेत शक्यतो फवारणी घ्यावि.

पाणी देताना ते वाफसा स्थितीत द्यावे..पाटपाणी देणे टाळावे.

"ज्यावेळी तुम्ही तेल्यासाठी फवारणी घेणार आहे त्याआधी तेल्याची सर्व फळे तोडून एक प्लास्टिक पिशवीत बागेबाहेर आणून जाळून टाकावीत व मग तेल्यावरील फवारणी घ्यावी. जर फळे तोडून न टाकता तशीच फवारणी केली तर त्या फळावरील बुरशीचे स्पोअर्स फवारणी प्रेशर किंवा हवेने निरोगी फळांवर पडून तेल्याचा अटॅक आणखी वाढू शकतो.. त्यामुळे एवढी काळजी नक्की घ्यावी"

नायट्रोजनयुक्त खतांचा वापर टाळावा.

बागेत आद्र्रता जास्त होऊ देऊ नका, त्यासाठी पावसाळ्यात बागेत पाणी साचल्यास बाहेर काढून देणे, फ्लो ने पाणी देणे टाळणे. ड्रीपने पाणी देण्याची वेळ कमी करणे हे पर्याय वापरावे.

ज्यावेळी फवारणी शक्य नसेल त्यावेळी कॉपर डस्टिंगचा वापर करा (कॉपर डस्टिंग साठी ८४८४ ८२ ५४११) या नम्बरवर मेसेज करा.

बागेला लिक्विड खतांची मात्रा कमी प्रमाणात द्या. डाग कव्हर झाला कि मात्रा पूर्ववत द्या

शिवाय,

शेजारी तेल्याग्रस्त बाग असेल व त्यातही काही उपयुक्त फवारणी दोन्ही बागांत किंवा शेजारील तेल्याग्रस्त बागेत नसेल तर तेल्याचा प्रादुर्भाव वाढणे साहजिक आहे.

आपल्या झाडाची ताकत मागे अनेक लेखांत सांगितलेल्या वेळापत्रक, नियोजन लेख इत्यादींतून वाढवून पाहावी...झाड सशक्त असेल तर तेल्याचा प्रादुर्भाव नक्कीच कमी राहतो.

तथापि सर्व उपाययोजना करुनही रोगाचं प्रादुर्भाव वाढलाच तर खर्च व उत्पन्न याचा ताळमेळ घालावा व तोटा अधिक प्रमाणात होत असेल झाडे काढून टाकून मध्ये एक दोन पिके घेऊन परत सशक्त डाळिंब झाडांची लागवड केलेली फायदेशीर राहील.

धन्यवाद.

श्री सुशांत हिरालाल सुर्वे.

डाळिंबशेती मार्गदर्शक, संगमनेर

पीएच मीटर खरेदीसाठी येथे क्लिक करा.