श्री. विष्णूभाऊ घोडके, #मराठवाडा मधील #डाळिंबरत्न.

लाडसावंगी मराठवाड्यातील एक डाळिंब उत्पादक गाव. पारंपरिक पीक पद्धती सोडून, कसमादे पट्ट्यात वेळोवेळी जाऊन मराठवाड्यात डाळिंबशेती घेऊन येणाऱ्या युवा डाळिंब उत्पादकांची हि रंजक कहाणी. दोन दुचाक्या पासून सुरु झालेला प्रगतीचा प्रवास डाळिंबशेतीच्या माध्यमातून दोनशे चारचाक्यांपर्यंत कसा गेला याची हि गोष्ट. आवड असेल तर कितीही अडचणी आल्या तरी माघार घ्यायची नाही अशाच पद्धतीची हि डाळिंब गोष्ट नक्की वाचा.

श्री सुशांत हिरालाल सुर्वे

6/19/20231 min read

श्री. विष्णूभाऊ घोडके, #मराठवाडा मधील #डाळिंबरत्न.

काल दिनांक, २१ मार्च २०२३ छत्रपती संभाजीनगर मधील लाडसावंगी गावातील डाळिंब बागेंना भेट दिली. या भागातील डाळिंब शेतकरी श्री. शंकर पवार, भरत पडूळ, अस्लम शेख, जगदीश पवार यांनी मागील वर्षी संगमनेर येथे येऊन भेट घेतली होती. एकदा आमचेकडे भेट द्या असे त्यांनी त्यावेळी सांगितले होते, आणि बऱ्याच दिवसांतून काल योग जुळून आला.

बऱ्याच भागांना भेटी दिल्या, त्यावेळी अनेक शेतकरी एकच नाव घ्यायचे विष्णुभाऊं मुळे आम्ही डाळिंबात आलो, आज पण त्यांचे मार्गदर्शन राहते...!

श्री. विष्णू घोडके नाव तर ऐकले होते, पण ठीकपणे लक्षात येईना. दोन तीन प्लॉट ला भेटी झाल्यानंतर विष्णुभाऊंची भेट झाली. आणि बाकी मग दुपारी अडीचपासून ते रात्री साडेआठ वाजेपर्यंत आम्हांला जेऊ घालून निरोप देईपर्यंत विष्णुभाऊ सोबत होते. भेट झाल्यानंतर तुम्हांला फेसबुक, युट्युब ला मी फॉलो करतो, आपले बोलणेही झाले आहे असे विष्णुभाऊंनी सांगितले आणि मग ओळख पटली.

श्री. विष्णू घोडके नाव तर ऐकले होते, पण ठीकपणे लक्षात येईना. दोन तीन प्लॉट ला भेटी झाल्यानंतर विष्णुभाऊंची भेट झाली. आणि बाकी मग दुपारी अडीचपासून ते रात्री साडेआठ वाजेपर्यंत आम्हांला जेऊ घालून निरोप देईपर्यंत विष्णुभाऊ सोबत होते. भेट झाल्यानंतर तुम्हांला फेसबुक, युट्युब ला मी फॉलो करतो, आपले बोलणेही झाले आहे असे विष्णुभाऊंनी सांगितले आणि मग ओळख पटली.

विष्णूभाऊ घोडके म्हणजे मराठवाड्यात डाळिंब रुजवणार निःस्वार्थी व्यक्तिमत्व. सन २००३-०४ च्या दरम्यान कृषी विभाग मधील श्री पोकळे साहेब यांची बदली कसमादे मध्ये झाली, त्यावेळी तेथील डाळिंबशेती-आर्थिक उलाढाल बघून पोकळे साहेबांनी विष्णू अरे इकडे या एकदा, डाळिंब पीक आहे, चांगले पैसे बनत आहेत. तुम्ही या एकदा बघायला म्हणून त्यांना बोलावले. पहाटे ४ वाजता घरातून निघून, दोन मोटारसायकल वर २५० किलोमीटर चा प्रवास करून हे शेतकरी कसमादे मधील डाळिंब शेती बघण्यास जाऊ लागले. महिन्यातून एक दोन वेळा तिकडे जायचे ते शेतकरी सांगतील त्या बागा बघायच्या, त्यातून डाळिंबशेती मधील बारकावे शिकायचे असे वेळापत्रक सुरु झाले. मग त्यातून लाडसावंगी,करमाड व आजूबाजूच्या भागात डाळिंबशेतीची सुरुवात या ग्रुपने केली.

२००७-०८ पर्यंत अतिशय उत्कृष्ट असे उत्पादन डाळिंब बागेत अनेक शेतकरी विष्णुभाऊंच्या मार्गदर्शनखाली घेऊ आले. विष्णुभाऊ सांगतात अतिशयोक्ती वाटेल सर पण, सव्वा एकरात २८ टनापर्यंत मजल-२०० ग्राम प्लस माल एकावेळी १७ टन पर्यंत हार्वेस्ट असे रेकॉर्डब्रेक उत्पादन इथल्या डाळिंबशेतीत होऊ लागले. सीझनमध्ये कमी बाजारभाव असताना देखील, ३०-३५ लाखापर्यंत उलाढाली या डाळिंबशेतीत होऊ लागल्या. अनेक वर्ष खूप चांगले दिवस येथील डाळिंबशेतीने विष्णुभाऊंच्या मार्गदर्शन खाली येथील शेतकऱ्यांना दाखवले.

त्यावेळी एक कंपनी मार्फत आयोजित सत्कार सन्मान साठी, ज्या पोकळे साहेबांनी या ग्रुपला कसमादे मधील डाळिंबशेती बघायला बोलवले होते त्यांना आमंत्रित करण्यात आले होते त्यावेळी कार्यक्रमस्थळाबाहेरील फोरव्हीलर ची संख्या पाहून पोकळे साहेब म्हंटले होते, विष्णू हे सगळे खरंच डाळिंब शेतकरीच आहे ना ..? कारण कसमादे मध्ये डाळिंबशेती पाहायला जाताना, एक चांगली तर एक फुडरेस्ट नसलेल्या मोटरसायकलवरून जाणाऱ्या या शेतकरी ग्रुपचा प्रवास २०० चारचाकी पर्यंत येऊन ठेपला होता.

डाळिंबशेतीने एक आर्थिक सुबत्ता यातील प्रत्येक शेतकऱ्याला दिली होती. व या मागे मोठे काम होते विष्णुभाऊंचे.

शिकण्याची आवड एवढी कि, त्यावेळी आर बी हर्बल ची सुरुवात आणि श्री रामदास पाटील साहेब यांना डाळिंब मध्ये फुलगळ संबंधी विचारण्यासाठी या माणसाने लाडसांगवी ते पाटील साहेबांची लॅब अशा तीन चकरा मोटारसायकल वरून मारल्या. तिसऱ्या वेळेस पाटील साहेब सहज बाहेर आल्यावर म्हंटले, हि गाडी कोणाची...विष्णुभाऊ माझी असे म्हंटल्यावर, पाटीलसाहेबांनी विष्णू तू फुलगळ च कारण विचारायला मोटारसायकल वरून २५० किलोमीटर प्रवास करून येतोय ..? अरे काही लोकांची हयात गेली डाळिंबात त्यांना नाही कळलं कि नेमकी कोणत्या कारणाने फुलगळ होती आणि तू इथं गाडीवर आलास तीन वेळा विचारायला, जा आता..ऊन वाढलं का थांबलं फुलगळ, पुन्हा येऊ नको आता गाडीवर...!

त्याकाळी, डाळिंबशेती करताना श्री. रामदास पाटील सर यांचं मार्गदर्शन सुद्धा खूप लाभलं असे विष्णुभाऊ आवर्जून सांगतात.

डाळिंबासाठी हजारो किलोमीटर चा मोटारसायकल प्रवास..एवढी शिकण्याची चिकित्सक वृत्ती.

शिकण्याच्या त्या सवयींचा परिणाम, आज हि व्यक्ती, डाळिंब मधील पॉलिनेशन वर मोठ्या आत्मविश्वासाने बोलत होती, १७-१८ वर्षात या व्यक्तीने पुष्कळ ज्ञान कमवले..मराठवाडा सोबत, अमरावती-खान्देश मधील शेतकऱ्यांना देखील मार्गदर्शन केले.. व अजूनही अविरत ते सामान्य डाळिंब उत्पादकांना त्या ज्ञानाच्या आधारे मार्गदर्शन करतात. वातावरण बदलले तसे मराठवाड्यामधील देखील डाळिंबशेती देखील संकटांच्या फेऱ्यात सापडली गेली. बरंच क्षेत्र कमी झाले. पण २००५-०६ पासून २०१६-१७ पर्यंत अनेक मोठी उलाढाल येथील डाळिंबशेतीने पाहिली. अनेक शेतकऱ्यांनी या पैशातून काही स्थावर मालमत्ता, जमीन घेतल्या.

आजही डाळिंबशेतीच परवडते, दुसरं काही पीक परवडत नाही...डाळिंब मध्ये किमान काही पैसे घडतात, इतर पिकांचा बाजारभावाचा काही भरवसा नाही..अशा प्रतिक्रिया या भेटीत अनेक डाळिंब उत्पादकांनी दिल्या.आपल्या युट्युब चॅनेल,ग्रुपच्या माहितीचा फायदा होतो..तसेच विष्णुभाऊंचे मार्गदर्शन नेहमी राहते. त्यामुळे अजूनही चांगल्याप्रकारे डाळिंबशेती मध्ये उत्पन्न घेत आहोत. मला तुमची माहिती खूप आवडते,बोलण्यातील स्पष्टपणा आवडतो, तुमच्या पावसाळ्यातील डाळिंबबाग शेड्युल च्या जोरावर मी बाकी शेतकऱ्यांना सांगितले होत कि, या पद्धतीत स्प्रे झाले तर कितीही पावसात या प्लॉटवर डाग येणार नाही..विष्णुभाऊं सारख्या शेतकऱ्याकडून अशी प्रतिक्रिया मिळणे म्हणजे खूप काही होते.

शेवटी, सध्या डाळिंबशेतीत आम्ही शेतकरी कुठे कमी पडतोय, कुठे काय अडचणी आहेत...तुमच्याकडून काय माहिती, मदत आम्हाला हवी आहे याबद्दल विष्णुभाऊंनी खूप चांगले इनपुट दिले आहेत. त्याचा अभ्यास व विचार करून त्याबद्दल माहिती-लेख आपण लवकरच सर्व डाळिंब उत्पादकांसाठी प्रसारित करूयात.

खूप चांगला दिवस लाडसांगवी येथे गेला, अनेक डाळिंबबागांना भेटी देखील झाल्या. महिन्यातून एक दोन दिवस लाडसावंगी साठी देण्यासाठी प्रयत्न असेल. सर्वच शेतकऱ्यांनी खूप चांगले स्वागत केले. श्री. विष्णुभाऊ, बंडूभाऊ पडूळ, रामदासजी दाभाडे व ज्यांनी या भेटीसाठी निमंत्रित केले असे वर उल्लेख केलेले सर्व डाळिंब उत्पादक, व तेथे उपस्थित असणाऱ्या प्रत्येकाचे आभार.

डाळिंबशेती उभी करताना आपल्यासोबत इतरांनाही उभे करावे, डाळिंबशेतीत आपण नेहमी शिकत राहावे..त्यातून मिळालेल्या आपल्या ज्ञानाचा फायदा इतरांनाही व्हावा, व यातून आपल्या अपरोक्ष देखील एखाद्या सामान्य शेतकऱ्याने त्याच्या उत्कर्षात आपले नाव घ्यावे असे श्री विष्णुभाऊ घोडके हे मराठवाड्यातील खरे डाळिंबरत्न आहेत..!!

धन्यवाद.

लाडसावंगीकर डाळिंब उत्पादक.

श्री. सुशांत हिरालाल सुर्वे

डाळिंबशेती मार्गदर्शक