शेती शहराने वेढली जात असताना ...

आजूबाजूने शहराने वेढल्यानंतर जमीन विकून एकदाच पैसे मिळवण्यापेक्षा त्या डेव्हलोप करून, त्यातच गुंतवणूक करून आयुष्यभर दरमहा उत्पन्न कसे मिळू शकते याचा विचार करून उभारलेले प्रकल्पांचे उदाहरण नक्कीच आदर्शवत आहेत, दिशादर्शक आहेत. या ब्लॉगमध्ये संगमनेरमधील अशाच काही प्रकल्पांची माहिती दिलेली आहे. जी गावे, खेडे आता शहरांच्या जवळ येत आहे. प्लॉटिंग, जमीन विक्री, गुंठा विक्री चे पेव जिथे सुटले आहे. अशा ठिकाणी जमिनी विकून एकदाच पैसे घेणेपेक्षा, अशा पद्धतीत काही प्रकल्प उभे केले तर आपल्याला नक्कीच चांगला मासिक परतावा आयुष्यभर मिळेल व आपल्यातील उद्योजकता, शेती बरोबरच शाश्वत सेकण्ड इन्कम या माध्यमातून मिळेल.

लाईफ ब्लॉग्स

Sushant Hiralal Surve

5/30/20231 min read

city skyline
city skyline

शेती व्यवसाय मध्ये काहीतरी जोडधंदा करणे हि आता काळाची गरजच आहे. विशेषकरून जी गावे आता मोठ्या शहरांच्या जवळ येत आहे त्यांना हि संधी मोठी आहे. कृषी पर्यटन हि संकल्पना यात अनेक वर्षांपासून आहे. पण यातील नवीन ट्रेंड सुद्धा बघणे आता फायदेशीर राहील.

मी संगमनेर शहरात राहतो. संगमनेर तसं मोठं शहर, लाखात लोकसंख्या. शहर मोठं झालं तसे आजूबाजूचे खेडे सुद्धा शहरांचा भाग बनत चालली. घुलेवाडी, गुंजाळवाडी, ढोलवाडी, समनापूर इत्यादी काही गावे, ज्यात अजूनही ग्रामपंचायत आहेत, हि गावे पण आता या शहराचाच भाग बनलेली आहे. या गावातील अनेक जमिनी आता प्लॉटिंग मध्ये रूपांतर आहेत.

आपले गाव, आपले शेत जेव्हा शहराचा भाग बनत चालते. किंवा मग आजूबाजूने शहर वेढले जाते. अशा वेळी जमिनींचे भाव चांगलेच वाढतात. अनेकवेळा या शेतजमिनी बिल्डर लोक एकर च्या हिशोबाने खरेदी करतात, व नंतर प्लॉटिंग करून एकएक गुंठा विकतात. शहरात अशा प्लॉटिंग ला खूप खरेदीदार असतात. शहरापासून ५-१५ किलोमीटरच्या परिसरात अशाच पद्धतीत प्लॉटिंग पडतात, शहराच्या ठिकाणी आपले घर असावे अशी अनेकांची इच्छा असते..पण मध्यवर्ती भागातील जागेच्या जास्त किमती, तेथील ट्रॅफिक, पार्किंग-गर्दी, फ्लॅट सिस्टिम मधील गर्दी, मोकळ्या हवेच्या अभाव इत्यादीमुळे अनेक लोक या सभोवतालच्या खेड्यांमधील प्लॉटिंग मध्ये गुंतवणूक करतात. येथील फ्लॅट अथवा जागा घेऊन स्वतःचा बंगला बांधण्यासाठी इच्छुक असतात. त्यामुळे आता शहरापेक्षा या आजुबाजुंच्या खेड्यांमधील प्लॉटिंगकडे अनेक लोक आकर्षित होतात. १०-१५ मिनिटात शहर या ठिकाणहून गाठता येते.

खेड्यात चालून आलेल्या या संधीचा फायदा अनेकवेळा शेतकऱ्यांना, मुख्य जमीन मालकांना अजिबात होत नाही. त्यांच्याकडूनच जमिनी घेऊन, तीच जमीन थोडी डेव्हलोपमेंट करून, रस्ते करून, झाडे लावून,प्लॉट पाडून दहापट अधिक किंमतीने विकल्या जातात.

अशावेळी या आलेल्या संधीतून, मुख्य जमीन मालकांना शाश्वत पैसे कसे कमविता येतील यासाठी संगमनेर शहराच्या बाजूला असलेल्या खेड्यांतील तीन उदाहरणे मला खूप सकारात्मक व दिशादर्शक वाटतात.

आपल्याला जमीन डेव्हलोप करून त्यातून पैसा मिळवायचा असेल, लोकांना गुंतवलेल्या पैशाला योग्य किंमत द्यायची असेल, व शेती न विकता ती राखून त्यातून व्यवसाय उभारायचा असेल तर गुंजाळवाडी मधील गंगासृष्टी, फिटनेस सेंटर व हिवरगाव पावसा येथील हॉटेल मयूर एक्सप्रेस हे तीन प्रकल्प एकदम दिशादर्शक आहे.

गंगासृष्टी-

गुंजाळवाडी हे गाव जसे शहराचा भाग बनत चालले तसे अनेकांनी जमिनी विकल्या, त्यात प्लॉटिंग करून बिल्डरांनी त्या इतरांना विकल्या. अशा वेळी गुंजाळवाडी मधील गुंजाळ कुटुंबीयांनी वेगळा विचार केला. एकत्रित कुटुंबाने आपली 18 एकर जमीन स्वतः डेव्हलोप करण्याचा निर्णय घेतला. यात कोणत्याही बिल्डरला टक्केवारीत घ्यायचे नाही, अथवा कुणाला पार्टनर करायचे नाही असं ठरलं. जो काही प्रकल्प उभारला जाईल तो वैयक्तिक गुंतवणूक व लोकांकडून बुकिंग चे पैसे घेऊन उभा करायचा असं ठरले. कोरोना मध्ये हा प्रकल्प चालू झाला पण अल्पावधीतच संगमनेर मधील एक आलिशान रहिवासी प्रकल्प म्हणून गंगासृष्टीचे नाव घेऊ जाऊ लागले. आजच्या मितीला कुणाला फ्लॅट / बंगला घ्यायचा असेल तर त्यांची पहिली पसंती हि गंगासृष्टी आहे.

सध्या गंगासृष्टी मध्ये गुंजाळ कुटुंबीयांनी 10 रो हाऊस, 7 बंगले, 48 फ्लॅट आणि 9 व्यावसायिक गाळे बांधलेले आहेत. यातील व्यावसायिक गाळे पूर्णतः भाडेतत्वावर दिलेले आहेत, तर बाकी रहिवासी बांधकामे पूर्णतः विकले गेले आहेत.

सध्या नवीन 370 फ्लॅट्स, आणि 23 व्यावसायिक गाळ्यांचे काम प्रगतीपथावर आहे. यातील पण जवळपास सगळे फ्लॅट बुक झाले आहेत. तसेच संगमनेरमधील पहिला मल्टिप्लेक्स आणि मॉल पण गंगासृष्टी मध्ये होत आहे.

एकत्रित असणाऱ्या या शेतकरी कुटुंबाने बिल्डर्स आणि डेव्हलोपर्स या क्षेत्रात पण आता आपला जम बसवला आहे. संगमनेर बरोबरच आता नाशिकमध्येही गुंजाळ कुटुंबीय आता नवीन प्रोजेक्ट सुरुवात करत आहे. एकत्रित शेतकरी कुटुंबाने आपली जमीन न विकता ती स्वतः डेव्हलोप करून त्यातून स्वतः नवीन व्यवसायात केलेले पदार्पण, लोकांनी प्रकल्पात केलेल्या गुंतवणुकीला विश्वासार्ह्य काम, त्यातून अल्पावधीतच लोकांचा विश्वास संपादन केला व आता बिल्डर्स डेव्हलोपर्स क्षेत्रात ते खूप चांगल्या पद्धतीत यशस्वी होऊन इतर जिल्ह्यातही आपला व्यवसाय वाढवत आहे. एक एकत्रित शेतकरी कुटुंब ते कुटुंबातील सदस्यांना सोबत घेऊन यशस्वी बिल्डर्स डेव्हलोपर्स हा प्रवास खूप प्रेरणादायक आहे.

फिटनेस सेंटर -

याच गुंजाळवाडी भागात झालेली दोन फिटनेस सेंटर पण मला खूप आवडली. या शेतकऱ्यांनी देखील आपली जमीन न विकता त्यात काही लाखो रुपयांची गुंतवणूक करून त्यात स्विमिंग पूल, बंदिस्त क्रिकेट-फ़ुटबाँल मैदान उभारले आहे. हे त्यांनी केवळ 20 गुंठ्यात उभारले आहे. यात स्विमिंग पूल साठी 100 रुपये प्रति व्यक्ती प्रति तास, व क्रिकेट फ़ुटबाँल साठी 800 रुपये प्रति तास असे भाडे आकारले जाते. लाखोंच्या शहरात अशा निवांत ठिकाणी व्यायाम अथवा मौजमजा म्हणून या ऍक्टिव्हिटी करायला येणाऱ्यांची संख्या पण भरपूर आहे. यातून ६०००-१०००० रुपये प्रति दिवस उत्पन्न या फिटनेस सेंटर उभारलेल्या शेतकऱ्यांना मिळत आहे.

आपल्या शेतजमिनीचा काही थोडाच भाग अशा पद्धतीने विकसित करून त्यातून दरदिवस उत्पन्न कसे मिळवता येईल यादृष्टीने केलेला विचार व यात आलेले यश पण खूप प्रेरणादायक आहे.

हॉटेल मयूर एक्सप्रेस:

यात आणखी एक उदाहरण द्यावे लागेल ते हॉटेल मयूर एक्सप्रेस, हिवरगाव पावसा येथील. श्री रामनाथ पावसे व पावसे कुटुंबीय हे शेतकरी कुटुंब. नाशिक पुणे रस्त्याचे रुंदीकरण, संगमनेर बायपास झाल्यानंतर पावसे यांची शेती हि रस्त्यालगत आली. नाशिक पुणे रस्ता हा खूप वाहतुकीचा रस्ता, रस्ता रुंदीकरण नंतर या भागात अनेक हॉटेल झाली. पण श्री पावसे कुटुंबीयांनी काहीतरी वेगळे, उत्कृष्ट करायचे असा निर्णय घेतला व त्यातून साकारले हॉटेल मयूर एक्सप्रेस.

संगमनेरमधील एक पंचतारांकित, प्रशस्त, शहराच्या गर्दीपासून दूर, सर्व सुविधांनी युक्त हॉटेल म्हणून आता मयूर एक्सप्रेस चे नाव घेतले जाते.

फॅमिली-रस्त्याने जाणारे प्रवासींसोबतच, अनेक कंपनी, क्लब त्यांच्या मोठ्या मिटिंग साठी मयूर एक्सप्रेसची निवड करतात. इलेक्ट्रिक चारचाकींसाठी चार्जिंग स्टेशन इत्यादी सुविधा त्यांनी उभ्या केल्या आहेत.

आजही कोणता कार्यक्रम या ठिकाणी झाला तर श्री रामनाथ पावसे स्वतःची ओळख शेतकरी म्हणूनच करून देतात, व कसे वाटले शेतकरी कुटुंबाचे हॉटेल.. येथील सुविधा, येथील जेवण याचा अभिप्राय पण घेतात.

अनेक ठिकाणी मोठे रस्ते आपल्या शेताजवळून गेले तर त्या जमिनी आपण एकतर भाडेतत्वावर देतो अथवा काही जमीन विकतो, अशा वेळी श्री रामनाथ पावसे व पावसे कुटुंबीयांनी साकारलेला प्रकल्प देखील दरमहा चांगले उत्पन्न देऊ शकतो, तसेच कुटुंबातील सदस्यांना, भावी पिढीला देखील रोजगार या माध्यमातून उपलब्ध होऊ शकतो.

गंगासृष्टी मध्ये गुंजाळ कुटुंबीयाने व्यावसायिक गाळे विकलेले नाहीत तर ते चांगल्या रकमेवर भाडेतत्वावर दिले आहेत, तसेच मॉल-मल्टिप्लेक्स मधून त्यांना दरमहा शाश्वत उत्पन्न मिळणार आहे, शिवाय या प्रकल्पातून त्यांनी नवीन व्यवसायात चांगले पदार्पण केले आहे, जे कि त्यांनी जर प्लॉट विकले असते किंवा भागीदारीत केले असते तर जमले नसते.

फिटनेस सेंटर उभारणाऱ्या शेतकऱ्यांनी देखील शहर जवळ आले म्हणून जमिनी न विकता, मोठा ग्राहकवर्ग आपल्या अवतीभोवती आहे हे लक्षात घेऊन फिटनेस प्रकल्पातून रोजचे हजारो रुपयांचे उत्पन्न मिळवत आहेत.हॉटेल मयूर एक्सप्रेस च्या बाबतीतही तेच आहे कि त्यांनी आपल्या शेताचे लोकेशन लक्षात घेऊन, या भागात कोणता व्यवसाय चालू शकतो व इतरांपेक्षा आपण काय वेगळे करू शकतो यातून सर्वसुविधांयुक्त हॉटेल ची निर्मिती केली व आज उदंड असा प्रतिसाद त्यांचा या बिझनेस ला मिळत आहे.

आजूबाजूने शहराने वेढल्यानंतर जमीन विकून एकदाच पैसे मिळ्वण्यापेक्षा त्या डेव्हलोप करून, त्यातच गुंतवणूक करून आयुष्यभर दरमहा उत्पन्न कसे मिळू शकते याचा विचार करून उभारलेले हे तीन प्रकल्प नक्कीच वेगळे आहेत, दिशादर्शक आहेत.

जी गावे, खेडे आता शहरांच्या जवळ येत आहे. प्लॉटिंग, जमीन विक्री, गुंठा विक्री चे पेव जिथे सुटले आहे. अशा ठिकाणी जमिनी विकून एकदाच पैसे घेणेपेक्षा, अशा पद्धतीत काही प्रकल्प उभे केले तर आपल्याला नक्कीच चांगला मासिक परतावा आयुष्यभर मिळेल व आपल्यातील उद्योजकता, शेती बरोबरच शाश्वत सेकण्ड इन्कम या माध्यमातून मिळेल.

धन्यवाद.

श्री सुशांत हिरालाल सुर्वे

डाळिंबशेती मार्गदर्शक, संगमनेर